Tuesday, July 21, 2020

एक मे ची आठवण

एक मे ची आठवण
नगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कुलमध्ये शिकत होतो. त्यावेळी पुस्तके हायस्कुलकडून मिळायची.  वर्षाच्या शेवटी परीक्षा झाल्यानंतर ती परत करायला लागायची. 
त्यावेळी १ मे ला वार्षिक निकाल असायचा. आजही आठवत आहे १ मे १९८१ चा दिवस, आमचा वार्षिक निकाल होता, माझा सहावीचा निकाल. त्यावेळी प्रथम सार्वजनिक प्रार्थना घेऊन सर्व प्रथम आलेल्या विध्यार्थ्याचे अभिनंदन केले जायचे. मी थोडा उशिराच शाळेत पोहचलो. प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांची नावे प्रवेशद्वाराजवळ मोठया फळ्यावर लिहलेली होती. "क" तुकडीत असूनही माझे नाव सहावीच्या यादीत पहिले लिहले होते कारण पाचही तुकड्यांमध्ये मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. 
सार्वजनिक अभिनंदनाचा कार्यक्रम आटोपला होता. वर्गात पोहोचलो तर मोरे मॅडमनी माझे तोंड भरून कौतुक केले. 
पण त्या म्हणाल्या अरे तुला प्रगती पुस्तक देता येणार नाही कारण तू इतर सगळी पुस्तके जमा केलीस पण इतिहास नागरिकशास्त्राचे पुस्तक जमा केलेले नाहीस. तुला एक तर पुस्तक परत द्यावे लागेल किंवा पुस्तकाचे पैसे भरावे लागतील. माझी स्थिती अतिशय केविलवाणी झाली. पुस्तक हरवले होते म्हणूनच मी परत करू शकलो नव्हतो. मग मी घरी जाऊन पैसे घेऊन यायचे असे ठरवले. 
घरी आलो तर घराला कुलूप होते. मला काय करावे काहीच कळेना रडवेला चेहरा घेऊन थोडावेळ बसून राहिलो. अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली मी फुलेबाईंच्या घरी गेलो त्यांना आम्ही मावशी म्हणायचो. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी लगेच १० रुपये दिले. मी पळतच शाळेत पोहचलो. वर्गात कोणीच नव्हते. पायातून प्राणच गेल्यासारखे झाले. मी वरच्या मजल्यावरून खाली आलो तर एक शिपाई मामा तिथे उभे होते त्यांना विचारले. ते म्हणाले अरे जा लवकर स्टाफरूममध्ये.
मी तडक स्टाफरूममध्ये गेलो ९ रुपये भरले मोरे मॅडमनी प्रगती पुस्तक माझ्या हातात दिले. मला एक उंच उडी मारावी अशी वाटली. पण सर्व शिक्षक तिथे बसलेले होते त्यामुळे तसे करू शकलो नाही. बाहेर आलो आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या मित्राला भिकुला मिठी मारली. यश किंवा आनंद व्यक्त करायला कुणीतरी जवळ असावं लागतं. 
घरी आल्यानंतर मी सगळी हकीकत सांगितली. आईने लगेच १० रुपये दिले आणि ते मी मावशींना परत करू आलो. संध्याकाळी पप्पा घरी आले माझा निकाल पाहून त्यांचा दिवसभराचा शिन कुठच्या कुठे गेला. त्यावेळपासून त्यांचा माझ्यावर पक्का विश्वास बसला की हा आयुष्यात काहीतरी चांगलं करेल. आणि मलाही आत्मविश्वास आला. जी अभ्यासासाठी मला मार्गदर्शन करायची ती माझी अक्का तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर स्वतःच यश मिळवल्याचा होता.
                                प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, कोल्हापूर

7 comments:

  1. श्रीकृष्ण महाजन हा आमच्यासाठी मित्र, मार्गदर्शक आणि फिलॉसॉफर! तो कॉलेजला असताना आमची मैत्री झाली. अभ्यास करण्याची त्याची शिस्त पाहून मी थोडाफार शहाणा झालो. मी शालेय जीवनात असा तसाच होतो. पण बी ए ३ मध्ये प्रथम येण्याची संधी मिळाली. प्रथम येण्याचा आनंद काही औरच असतो.

    असे आनंदाचे क्षण पुढे जगण्याला बळ देतात. सुरेख अनुभव. अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या बालपणाच्या यशाचे महत्व काय असते हे ते मिळविणा-या बाल विद्यार्थ्या शिवाय इत्तरांना कळणे अवघडच असते. मी ही अशीच यशामागे यश अगदी तिसरी ते दहावी पर्यंत मिळविली आहेत.हायस्कूल मधील एक यश म्हणजे तो माझ्यासोबत सर्वांना एक हास्यमय करयणूकीचाच विषय ठरला होता.१९७० साली मी न्यू हायस्कूल मध्ये १०वी ईयत्तेच्या "फ" तुकडी म्हणजे अ,ब,क,ड,ई,फ होय.पुढे ग,ह,आणि य याही तुकड्या होत्या.सरांनी १मे१९७० रोजी आमच्या तुकडीचा निकाल सांगितला होता.सर्व विषयात मी जेमतेम अडतीस ते पंचेचाळीसच मार्कच मिळऊन पास झालो होतो.तरीही आमच्या सरांनी शेवटी माझे विषेश अभिनंदन केले.कारण १० वी ई,फ,ग आणि य या चार तुकड्यांत मी एकटाच सर्व विषयात पास झालो होतो.माझ्या जोडीला १० वी ह या तुकडीतील आणखी तीनजन सर्व विषयात पास झाले होते.

      Delete
  2. खूप छान आठवणींचा खजिना उलगडला. निकालाचा दिवस आणि ती उत्सुकता या सर्व गोष्टी आठवल्या.

    ReplyDelete
  3. व्वा!सुरेख लिहिलंय!

    ReplyDelete
  4. खुप छान सर.👍🏻

    ReplyDelete
  5. सर, आपली ही आठवण केवळ भूतकाळातील एक किस्सा नसून, ती प्रेरणादायक अनुभवकथा आहे जी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांनाही शिकवण देते की समजूत, संवेदना आणि प्रोत्साहन यांचं बळ कुणाचंही आयुष्य बदलू शकतं.

    आपण असेच आठवणींमधून आयुष्याचे मोती आम्हाला सांगत राहावे, हीच नम्र विनंती.

    ReplyDelete