*वह्यांचा सुगंध*
शाळेत असताना पावसाळ्यासोबतच शाळेच्या दप्तराची तयारी करायला लागायची. वह्या खरेदी करायच्या म्हणजे एक लगबग असायची. नवीन वह्यांचा सुगंध मनाला प्रसन्नता द्यायचा आणि अभ्यासासाठी प्रेरणासुद्धा द्यायचा. नगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कुलमध्ये शिकत असताना पुस्तके वर्षभर वापरायला मिळायची. पण वह्या विकत घ्यायला लागायच्या. वडलांनी कधीही आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. जे आर्थिक प्रश्न निर्माण होतील ते जादा कष्ट घेऊन त्यांनी ते सोडविले. पण त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावर होऊ नये यासाठी ते धडपडत राहिले.
मला आठवतय आमच्या शाळेमध्ये एक निवेदन यायचे. साधारणतः तो पाचवी ते सातवीचा काळ होता. शाळेमध्ये हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी जांभळीकर मामा ट्रस्ट कडून वह्या मोफत दिल्या जातील अशी नोटीस असायची. त्यासाठी ट्रस्ट मध्ये जाऊन दहा पैसे देऊन अर्ज विकत घ्यावा लागायचा. तो भरून त्याच्यावर प्रतिष्ठित नागरिकांची सही करून तो परत जांभळीकर मामा ट्रस्टकडे द्यायला लागायचा. या तिन्ही वर्षी पाचवीला पाच, सहावीला सहा आणि सातवीला सात अशा दरवर्षी वह्या मला मिळत गेल्या. माझ्या सारख्या अनेक विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी या योजनेचा हातभार लागला. अशा ज्या संस्था आहेत त्या समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करतात आणि शिक्षणाची एक वेगळीच प्रेरणा त्या देत असतात. माझी मुलं शाळेत जाऊ लागली त्यावेळी दरवर्षी त्यांच्यासाठी वह्या खरेदीला बाजारात गेलो की, मला जांभळीकर मामा ट्रस्टची आठवण यायची. आजही नवीन वह्यांचा तो सुगंध मनाला त्या आठवणींच्या गुंजारवात घेऊन जातो आणि सामाजिक जाणिव जागी करत राहतो. आता या कोरोनाच्या लोकडाऊनमध्ये वह्यांच्या सुगंधाची प्रकर्षाने आठवण झाली.
प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन