Sunday, November 8, 2020

पेरूची आवड

 पेरूची आवड


परवा बाजारात पेरू खरेदी केले. पेरूच्या सुगंधानेच पेरुभोवतीच्या आठवणी मनात घोंगाऊ लागल्या. प्राथमिक शाळेला आम्ही मराठी शाळा असे म्हणत असू. मी मराठी पहिली ते चौथी हे शिक्षण नगरपालिकेच्या शाळा नं. ३२ म्हणजेच राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये घेतले. सोसायटीतून आमच्या शाळेत जायच्या रस्त्यावर मायडीचे तात्या पेरू विकायला बसत असत. पेरूच्या मोठ्या दोन बुट्ट्या घेऊन ते बसलेले असायचे. त्यांच्या हातात पेरू कापायचा एक चाकू आणि समोर मीठ आणि चटणी यांचा डबा असायचा.


एकवेळ मायडीचे आण्णा आणि माझे पप्पा सोबत असताना या तात्यांची आणि माझी ओळख झाली. नंतर येताजाता ते मला बोलवत असत आणि छोटासा पेरू कापून देत असत. एकवेळ मी पेरू खात घरी आलो हे पाहून आईने विचारले पेरू कोणी दिला. मी खरी गोष्ट सांगितली. आई म्हणाली असं फुकट काही खाऊ नये. त्यांना पैसे देऊन पेरू आणत जा.


तात्यांच्या पेरूची चवच काही न्यारी होती. पेरू बाधत नसत. शाळेतून येता जाता पेरू खाणे ही एक मेजवाणी वाटायची.


फॅक्टरीतील ताई म्हणजे माझ्या आईची मैत्रीण त्या पंचगंगा साखर कारखान्याच्या कॉलनीत राहत असत त्यांची बहीण जिजी याही त्यांच्या जवळच्याच क्वार्टर मध्ये राहत असत. या दोन्हीही घरांच्या परसात पेरूची झाडे होती. आई आणि ताई यांच्या गप्पा चालू असत आणि माझं लक्ष पेरूच्या झाडांकडे असे. त्यांची परवानगी असे म्हणून आम्ही झाडाचे पिकलेले पेरू काढून आणायचो. या ताईंच्या हातचे कांदेपोहे खाणे म्हणजे मेजवानीच असायची. ओल्या खोबऱ्याचा खिस पोह्यांवर सजवून त्या पोहे खायला देत असत आजही ती चव जिभेवर रेंगाळते आहे.


आम्ही राहत असलेल्या सोसायटीची मागची बाजू म्हणजे कल्याण केंद्र नावाच्या मंगल कार्यालयाची मागची भिंत होती. पण त्याच्या शेजारी असलेल्या एका सायझिंग वर्क्सच्या मागच्या बाजूला तारेचे कुंपण होते. इंडस्ट्रीयल इस्टेट नावाच्या औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी सोसायटीतील काही लोकांनी तारेचे कुंपण फासटवून येण्या जाण्याची सोय करून ठेवली होती.

 

इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये काही कारखान्यांच्या व बंगल्याच्या समोर बागेत पेरू, आंबा अशी फळांची झाडे होती. सुट्टी सुरू झाली की, आम्ही मुले सायझिंगच्या तारेच्या कुंपणातून पलीकडे जात असू. काठीने किंवा दगड मारून पेरू पाडायचे. कधी पिकलेले तर कधी कच्चे असे पेरू मिळत. कच्चे तुरट पेरू त्याला मीठ लावून खाणे हे मोठं सेलिब्रेशन असायचं. 


पप्पा ऑफिसमधून घरी परत येण्यापूर्वी आपण घरात यायचं हे ठरलेलं. त्यांनी आम्हा भावंडांच्या अंगावर कधीही हात उगारला नाही. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती (आदरयुक्त) होती. त्यामुळे त्यांच्या शिस्तीचा संस्कार माझ्या मनावर कोरला गेला. 


या सोसायटीत राहत असतानाच शेजारच्या गुरुजींच्या वडलांनी पेरुचे झाड लावलेले होते ते मोठे झाले. त्याच्या फांद्या आमच्या अंगणात आल्या आणि मला त्याचा फारच आनंद झाला कारण पेरू खायला मिळणार होते.


प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन

ssmahajan_suk@rediffmail.com 


Tuesday, July 21, 2020

वह्यांचा सुगंध

*वह्यांचा सुगंध*

शाळेत असताना पावसाळ्यासोबतच शाळेच्या दप्तराची तयारी करायला लागायची. वह्या खरेदी करायच्या म्हणजे एक लगबग असायची. नवीन वह्यांचा सुगंध मनाला प्रसन्नता द्यायचा आणि अभ्यासासाठी प्रेरणासुद्धा द्यायचा. नगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कुलमध्ये शिकत असताना पुस्तके वर्षभर वापरायला मिळायची. पण वह्या विकत घ्यायला लागायच्या. वडलांनी कधीही आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. जे आर्थिक प्रश्न निर्माण होतील ते जादा कष्ट घेऊन त्यांनी ते सोडविले. पण त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावर होऊ नये यासाठी ते धडपडत राहिले. 


मला आठवतय आमच्या शाळेमध्ये एक निवेदन यायचे. साधारणतः तो पाचवी ते सातवीचा काळ होता. शाळेमध्ये हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी  जांभळीकर मामा ट्रस्ट कडून वह्या मोफत दिल्या जातील अशी नोटीस असायची. त्यासाठी ट्रस्ट मध्ये जाऊन दहा पैसे देऊन अर्ज विकत घ्यावा लागायचा. तो भरून त्याच्यावर प्रतिष्ठित नागरिकांची सही करून तो परत जांभळीकर मामा ट्रस्टकडे द्यायला लागायचा. या तिन्ही वर्षी पाचवीला पाच, सहावीला सहा आणि सातवीला सात अशा दरवर्षी वह्या मला मिळत गेल्या. माझ्या सारख्या अनेक विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी या योजनेचा हातभार लागला. अशा ज्या संस्था आहेत  त्या समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करतात आणि शिक्षणाची एक वेगळीच प्रेरणा त्या देत असतात. माझी मुलं शाळेत जाऊ  लागली त्यावेळी दरवर्षी त्यांच्यासाठी वह्या खरेदीला बाजारात गेलो की, मला जांभळीकर मामा ट्रस्टची आठवण यायची.  आजही नवीन वह्यांचा तो सुगंध मनाला त्या आठवणींच्या गुंजारवात घेऊन जातो आणि सामाजिक जाणिव जागी करत राहतो. आता या कोरोनाच्या लोकडाऊनमध्ये वह्यांच्या सुगंधाची प्रकर्षाने आठवण झाली.
                                  प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन

एक मे ची आठवण

एक मे ची आठवण
नगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कुलमध्ये शिकत होतो. त्यावेळी पुस्तके हायस्कुलकडून मिळायची.  वर्षाच्या शेवटी परीक्षा झाल्यानंतर ती परत करायला लागायची. 
त्यावेळी १ मे ला वार्षिक निकाल असायचा. आजही आठवत आहे १ मे १९८१ चा दिवस, आमचा वार्षिक निकाल होता, माझा सहावीचा निकाल. त्यावेळी प्रथम सार्वजनिक प्रार्थना घेऊन सर्व प्रथम आलेल्या विध्यार्थ्याचे अभिनंदन केले जायचे. मी थोडा उशिराच शाळेत पोहचलो. प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांची नावे प्रवेशद्वाराजवळ मोठया फळ्यावर लिहलेली होती. "क" तुकडीत असूनही माझे नाव सहावीच्या यादीत पहिले लिहले होते कारण पाचही तुकड्यांमध्ये मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. 
सार्वजनिक अभिनंदनाचा कार्यक्रम आटोपला होता. वर्गात पोहोचलो तर मोरे मॅडमनी माझे तोंड भरून कौतुक केले. 
पण त्या म्हणाल्या अरे तुला प्रगती पुस्तक देता येणार नाही कारण तू इतर सगळी पुस्तके जमा केलीस पण इतिहास नागरिकशास्त्राचे पुस्तक जमा केलेले नाहीस. तुला एक तर पुस्तक परत द्यावे लागेल किंवा पुस्तकाचे पैसे भरावे लागतील. माझी स्थिती अतिशय केविलवाणी झाली. पुस्तक हरवले होते म्हणूनच मी परत करू शकलो नव्हतो. मग मी घरी जाऊन पैसे घेऊन यायचे असे ठरवले. 
घरी आलो तर घराला कुलूप होते. मला काय करावे काहीच कळेना रडवेला चेहरा घेऊन थोडावेळ बसून राहिलो. अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली मी फुलेबाईंच्या घरी गेलो त्यांना आम्ही मावशी म्हणायचो. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी लगेच १० रुपये दिले. मी पळतच शाळेत पोहचलो. वर्गात कोणीच नव्हते. पायातून प्राणच गेल्यासारखे झाले. मी वरच्या मजल्यावरून खाली आलो तर एक शिपाई मामा तिथे उभे होते त्यांना विचारले. ते म्हणाले अरे जा लवकर स्टाफरूममध्ये.
मी तडक स्टाफरूममध्ये गेलो ९ रुपये भरले मोरे मॅडमनी प्रगती पुस्तक माझ्या हातात दिले. मला एक उंच उडी मारावी अशी वाटली. पण सर्व शिक्षक तिथे बसलेले होते त्यामुळे तसे करू शकलो नाही. बाहेर आलो आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या मित्राला भिकुला मिठी मारली. यश किंवा आनंद व्यक्त करायला कुणीतरी जवळ असावं लागतं. 
घरी आल्यानंतर मी सगळी हकीकत सांगितली. आईने लगेच १० रुपये दिले आणि ते मी मावशींना परत करू आलो. संध्याकाळी पप्पा घरी आले माझा निकाल पाहून त्यांचा दिवसभराचा शिन कुठच्या कुठे गेला. त्यावेळपासून त्यांचा माझ्यावर पक्का विश्वास बसला की हा आयुष्यात काहीतरी चांगलं करेल. आणि मलाही आत्मविश्वास आला. जी अभ्यासासाठी मला मार्गदर्शन करायची ती माझी अक्का तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर स्वतःच यश मिळवल्याचा होता.
                                प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, कोल्हापूर