Monday, July 31, 2023

बचत संस्कार


काटकसर करून घर चालवायचे आणि बचत करून भविष्याचा वेध घ्यायचा हे तत्व आईने आमच्यात रुजविण्याचा प्रयत्न केला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. येणाऱ्या तुटपुंजा पगारातून खर्चात काटकसर करून पैसे वाचवायचे आणि बचत करायची अशी सवय तिने स्वतःला लावून घेतली होती. इचलकरंजीमध्ये महिला सहकारी बँक सरोजिनीताई खंजिरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. या बँकेच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य महिलांच्या घरी बचतीसाठी लोखंडी बचत पेटी दिली जात असे. महिनाभर या पेटीत महिलांनी आपल्या बचतीची रक्कम टाकावयाची आणि महिन्यातून एकदा बँकेची कर्मचारी घरी येऊन त्यातील रक्कम बचत खात्यावर जमा करून जात असे. यासाठी एक कार्ड सभासदाकडे व एक कार्ड बँकेकडे दिलेले असे. त्याचबरोबर त्या बचत पेटीची एक किल्ली बँकेकडे तर दुसरी किल्ली सभासदाकडे असे. आई या योजनेची व बँकेची सभासद झाली होती. या माध्यमातून अनेक महिलांना बचत करण्याची सवय तिने लावली.


बचतीतून अशा उरणार्‍या पैशातून (गुरुपुष्यामृत असताना) गुंजभर सोने खरेदी करता येते का हेही ती पाहायची. अर्थात जेवढा थोडाफार पैसा आहे त्यातच तो टिकवायचा, खर्च कमी करायचा, बचत करायची असे तिचे आर्थिक नियोजन केले आणि आमच्या कुटुंबाला वळण लावले. अशी बचत करीत असतानाच जमलेल्या पैशातून दोन यंत्रमाग खरेदी करावेत अशी सूचना आमचे स्नेही आकाराम टोणपे (मामा)यांनी केली आणि ते माग भाड्याने घेण्याची ही तयारी दर्शवली. त्याप्रमाणे दोन माग खरेदी करून त्यांच्याकडेच भाड्याने देण्यात आले. त्या मागाचे भाडे येऊ लागले. त्या भाड्याच्या उत्पन्नातून आणखी दुसरे दोन यंत्रमाग खरेदी केले आणि तेही भाड्याने दिले. अशातऱ्हेने बचतीतून उत्पन्नाचा आणखी एक मार्ग सुरू झाला आणि कुटुंबाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त ठरला. मुलांचे शिक्षण सुरू होते. मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्याला नोकरी नव्हती. म्हणून त्याने यंत्रमागाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. रत्नदीप वसाहत गंगानगर येथे आम्ही खरेदी केलेल्या प्लॉटवर 14 मागांचा प्रशस्त कारखाना कर्ज काढून उभा केला. अर्थात कष्टाची तयारी असली तरी व्यवसायाची संपूर्ण माहिती होती असे नाही आणि त्यातच त्या दोन-तीन वर्षांमध्ये वस्त्रोद्योगांमध्ये मंदीचे वातावरण होते. त्यामुळे यंत्रमागाचा व्यवसाय चालवणे कठीण झाले. कर्जावरचे व्याज वाढत गेले. त्यामुळे कारखाना विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. 1989 मध्ये कारखाना व मागांची विक्री करून आम्ही 1990 मध्ये भारतमाता हौसिंग सोसायटी गंगानगर येथे "श्रमदीप" हे घरकुल उभे केले. (तेही शक्य झाले कारण 1975 साली या सोसायटीचे पैसे तिने आपल्या बचतीतून भरले होते. त्यामुळे तिथे एक प्लॉट मिळालेला होता.) या सर्व आर्थिक अडचणीतून आम्ही बाहेर पडू शकलो ते केवळ आईने स्वीकारलेल्या बचतीच्या सवयीमुळे आणि योग्य आर्थिक नियोजनामुळेच होय!


Wednesday, February 1, 2023

विकासाला गती देणाऱ्या पायाभूत सुविधा आवश्यक

 

विकासाला गती देणाऱ्या पायाभूत सुविधा आवश्यक

प्रा. डॉ. श्रीकृष्णमहाजन*

प्रभावी पुरवठा साखळी व्यवस्थापनावर आधुनिक अर्थव्यवस्थांच्या आर्थिक वृद्धीचा वेग अवलंबून राहणार आहे हे व्यवस्थापन पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर आधारित असल्याने पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक वृद्धीचा महत्त्वाचा घटक म्हणून विचारात घेतल्या जातात. रेल्वे, बंदरे, रस्ते तसेच शेती, अन्न, लोखंड आणि कोळसा क्षेत्राला जोडणाऱ्या पायाभूत सुविधायांना सरकारने प्राधान्य दिले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला गती देण्यासाठी गतिशक्ती हा विकासा आराखडा महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. (अर्थातच त्या असंघटित क्षेत्रातील रोजगाराच्या असतात). प्रधानमंत्री आवास योजना, नॅशनल स्मार्ट सिटी मिशन, मेट्रो रेल अंड रिजनल रॅपिड ट्रेन सीटसिस्टीम आणि अमृत मिशन हे कार्यक्रम देशाच्या सम्यक विकासाची ग्वाही देणारे आहेत असे मानले जाते. पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन व राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन याचा समावेश यापूर्वीच करण्यात आला होता. 2030 पर्यंत जगातील तिसरा मोठा देश म्हणून उभरण्यासाठी पायाभूत सुविधा विकासाचे सातत्य गरजेचे मानले जाते. 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी सरकारला अर्थसंकल्पाचा सिंहाचा वाटा हा पायाभूत सुविधांसाठी ठेवावाच लागणार आहे. त्यातून निर्माण होणारा रोजगार 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे दिशानिर्देश करणारा ठरणार आहे.  गतिशक्ती संबंधित प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने राज्यांना  77  हजार कोटी रुपयांची व्याजमुक्त कर्ज भांडवली खर्च कर्ज म्हणून यापूर्वीच मंजूर केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.  हि योजना याही अर्थसंकल्पात सुरु ठेवण्यात आली आहे याचा लाभ महाराष्ट्रालाही होऊ शकतो.

समावेशक विकास, कृषी क्षेत्राला उपयुक्त डिजिटल पायाभूत सुविधा, वित्तीय क्षेत्र, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, हरित वृद्धी, युवा शक्ती आणि क्षमता उजागर हि २०२३-२४ या अर्थसंकल्पाची प्राधान्ये "सप्तरींशी" आहेत असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले आहे. आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा विकासामधील गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता दिसून येते. त्यामुळेच २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चाची तरतूद ३७.४ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

बंदर, कोळसा, लोखंड, खते  या क्षेत्रांना जोडण्यासाठी १०० वाहतूक पायाभूत सुविदाह प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद आशादायक वाटणारी आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेची तरतूद ६६ टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.  त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती द्यायला मदत होणार आहे. नागरी पायाभूत सुविधा विकास निधीच्या माध्यमातून टायर-२ व ३ शहरांसाठी नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांना याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

दर्जेदार पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी बालके आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची स्थापना केली जाईल. १५७ नर्सिंग कॉलेज सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य  व शिक्षण या सामाजिक क्षेत्रांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक लाक्षणिक स्वरूपाची नाही. यावरून याबाबत सार्वजनिक क्षेत्राऐवजी खाजगी क्षेत्राकडून सरकारच्या अपेक्षा असल्याचे अप्रत्यक्ष दिसून येत आहे.

शेती क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील असे बजेटमध्ये नमूद केलेले आहे.  परंपरागत पायाभूत सुविधांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधांची भर पडली आहे.  त्यासाठीसुद्धा अर्थसंकल्पात तरतुदी दिसून येतात.  ज्यातून ऑनलाईन बाजार वित्तीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.  कृत्रिम बुद्धिमत्तेची देशात तीन महत्वाची केंद्रे उभी केली जाणार आहेत.   जी सेवांचा वापर करणारे अप्लिकेशन विकसित करण्यासाठी देशभरातील अभियांत्रीकी संस्थांमध्ये १०० प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.  

दळणवळणाच्या विकासामुळेऔद्योगिकक्षेत्र, सेवा क्षेत्र पर्यटन क्षेत्राच्या विकासाला गती मिळण्यास मदत होते.  रेल्वेसाठी दोन लाख चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ५० नव्या विमानतळांची घोषणा करण्यात आली आहे.  तथापि अस्तित्वात असलेल्या छोट्या विमानतळांच्या सेवा गुणवत्ता वाढीसाठी विशेष तरतूद दिसून येत नाही.  तथापि रेल्वे,  विमानतळयांचा महाराष्ट्राला लाभदायक होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कार्यक्षम अद्ययावत पायाभूत सुविधा आवश्यक असणार आहेत.

*अधिष्ठाता, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

*********